राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघातील दोघींना करोनाची लागण झाली आहे, त्यामुळे त्या भारतातच थांबल्या आहेत. मात्र या दोघींची नावे सांगणे टाळण्यात आले आहे. आता संघ या दोन खेळाडूंविनाच स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सलामीची लढत खेळणार आहे. सध्याच्या घडीला करोना झालेल्या खेळाडूंना पाच दिवस विलगीकरणात ठेवण्यात येते आणि त्यानंतर त्यांना संघात स्थान मिळू शकते.
बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आता काही तासांवर येऊन ठेपली आहे. पण ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. कारण या स्पर्धेपूर्वीच भारतीय क्रिकेट संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे आता समोर आले आहे. पण या दोन खेळाडूंची नावं मात्र बीसीसीआयने सांगितलेली नाहीत.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघातील दोघींना करोनाची लागण झाली आहे, त्यामुळे त्या भारतातच थांबल्या आहेत. मात्र या दोघींची नावे सांगणे टाळण्यात आले आहे. भारतीय संघ रविवारी सकाळी बर्मिंगहॅमला दाखल झाला आहे. आता संघ या दोन खेळाडूंविनाच स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सलामीची लढत खेळणार आहे. हा सामना शुक्रवारी आहे. भारताची दुसरी लढत ३१ जुलै या दिवशी पाकिस्तानविरुद्ध तर तिसरी साखळी लढत बार्बाडोसविरुद्ध आहे. या स्पर्धेतील सर्व लढती एजबॅस्टन येथे होणार आहे. पहिला आणि दुसरा उपांत्य सामना ६ ऑगस्टला होणार आहे. त्याचबरोबर कांस्यपदकाची लढत ७ ऑगस्टला होणार आहे. अंतिम सामनाही ७ ऑगस्ट रोजी दिवस-रात्र खेळवला जाईल.
सध्याच्या घडीला करोना झालेल्या खेळाडूंना पाच दिवस विलगीकरणात ठेवण्यात येते आणि त्यानंतर त्यांची पुन्हा एकदा करोना चाचणी घेण्यात येते. या चाचणीमध्ये जर खेळाडू करोना निगेटीव्ह सापडले तर त्यांची फिटनेस चाचणी घेण्यात येते. या चाचणीमध्ये पास झाल्यावरच त्यांना संघात दाखल करण्यात येऊ शकते. राष्ट्रकुल स्पर्धेत हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करेल तर स्मृती मानधना उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. टीम इंडियाला या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस आणि पाकिस्तानसह अ गटात ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर ब गटात इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघाचा समावेश आहे.
भारतातून २१५ खेळाडू बर्मिंगहॅमला जाणार
भारतीय महिला क्रिकेट संघ २१५ सदस्यीय संघाचा भाग आहे जो देश बर्मिंघम येथे खेळांसाठी पाठवणार आहे. या संघात १०८ पुरुष आणि १०७ महिलांचा समावेश आहे. एकूण सदस्य ३२२ असतील. यामध्ये ७२ संघ अधिकारी, २६ अतिरिक्त अधिकारी, नऊ प्रासंगिक कर्मचारी आणि तीन महाव्यवस्थापकांचा समावेश आहे.