❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
🌹🙏🙏🌹
आज स्वामी समर्थ पूण्यतिथी च्या निमित्ताने...!
हम गया नही जिंदा है या वाक्यातच विलक्षण जादू आहे. हे वाक्य लिहिलं, ऐकलं, वाचलं तरी खूप मानसिक समाधान मिळते, सकारात्मकता येते अन विस्कटलेलं कामही योग्य मार्गी लागते. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभय वचनाने तर सर्व भीतीच संपवली आहे. वाईट गोष्टींशी, संकटांशी बिनदिक्कत तलवार घेऊन लढा, या युद्धात पूर्वकर्माने तुमच्यावरही वार होतील, तुम्ही ही खाली पडाल पण स्वामी तुम्हाला पुन्हा उठवतील, लढण्याची ताकद देतील. शेवटी विजय तुमचाच आहे. फक्त रणछोड दास होऊ नका कारण स्वामींना ते कदापी नाही आवडणार.
*स्वामींनी आपल्या निर्वाणाच्या आधीच भक्तांना संकेत दयायला सुरुवात केलेली. आपल्या साऱ्या वस्तू एका भक्ताकडून मागवून घेतल्या. त्यात त्यांचे कमंडलू, खडावा, दंड ही होते. त्या सर्वांना वाटून टाकल्या. त्यावेळी सर्व भक्तांना आश्चर्य वाटले. बावडेकर नामक भक्ताने त्यांना सांगितले की महाराज काहीतरी आपल्या जवळ ठेवा..तर स्वामी म्हणाले "अरे भो.... ही लंगोटी पण माझी नाही, मला काय रे करायच्यात या वस्तू .." कोल्हापूरचे वामनराव कोल्हटकर स्वामींचे भक्त. स्वामी त्यांना लाडाने वामन्या अशी हाक मारत. त्यांच्या मनात स्वामींना आपल्या घरी नेऊन भोजन घालावे अशी खूप इच्छा होती पण स्वामींचे वय अन प्रकृती बघता ते स्वामींना काही बोलले नाहीत. एकदा स्वामीच त्यांना म्हणाले "वामन्या भ.... घरात एवढं धान्य भरून ठेवलस पण आम्हाला कधी जेवायला बोलवलं नाहीस." त्यावेळी वामनराव म्हणाले " महाराज सर्व तुमचंच आहे तुम्ही कधीही यावं.." त्यावर स्वामींनी सांगितलं "असं म्हणतोस तर येतो गुरुवारी. भाकरी अन ठेचा करून ठेव .." वामनराव अगदी आनंदात घरी परतले. ठरल्याप्रमाणे गुरुवारी सर्व जेवणाची तयारी झाली भाकऱ्या, ठेचा, वांग्याचे भरीत.. ते दाम्पत्य स्वामींची वाट पाहत होते. स्वामी आले पण ते एकटेच होते त्यांच्याबरोबर त्यांचा भक्तपरिवार नव्हता. वामनरावांनी स्वामींचे मनापासून स्वागत केले अन विचारले तुम्ही एकटे आलात ? कोणाला बरोबर नाही आणलंत ??त्यावेळी स्वामी म्हणाले "तुला कशाला हव्या नसत्या चांभारचौकशा ? भूक लागलेय आम्हाला जेवायला वाढ .." आणी स्वामींनी मनसोक्त भोजन केलं. वामनरावांना भरून पावलं स्वामींनी त्यांची इच्छा पूर्ण केली.. पण स्वामी एकटेच का आले हा विचार त्यांना शांत बसू देईना म्हणून त्यांनी याबद्दल विचारणा करण्यासाठी एकाला अक्कलकोट ला पाठवलं. त्या माणसाने परत आल्यावर सांगितलं की, स्वामींनी मंगळवारीच आपला देह ठेवला... असे हे स्वामी !!*
*चैत्र शुद्ध द्वितीयेला, शके १०७१, इ.स.११४९ मध्ये छेली खेड्यामध्ये प्रकटलेल्या या परब्रह्ममूर्तीने, अतर्क्य, अद्भुत आणि बोला-बुद्धीच्या पलीकडच्या अनंत लीला करून, शके १८०० च्या चैत्र कृष्ण त्रयोदशीला, मंगळवारी दि. ३० एप्रिल १८७८ रोजी दुपारी ४-४.३० च्या सुमारास अक्कलकोटी देहत्यागाची लीला केली. देहत्यागाची लीला म्हणण्याचे कारण म्हणजे, श्रीस्वामी समर्थांनी प्रत्यक्ष देह ठेवलेलाच नाही. त्यांनी प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना स्वमुखाने सांगितले होते की, ते ८०० वर्षे त्याच देहातून कार्य करीत असून, पुढची हजारो वर्षे ते कार्य चालूच राहणार आहे ! शिवाय त्यांचे वचन आहेच, "हम गया नही जिंदा है ।" त्यामुळे श्री स्वामी महाराज कुठेही गेलेले नाहीतच. त्यांनी फक्त आपले कार्य पडद्यामागून करावयास सुरुवात केली बस्स इतकंच. स्वामी पूर्ण विश्वात आहेत तर दुसऱ्या कुठल्या निजधामास त्यांना जायची गरजच काय?? स्वामींनी अगोदरच सांगितल्याप्रमाणे बुधवार पेठेतील ब्रह्मनंद गुंफेत स्वामीभक्तांनी जड अंतःकरणाने त्यांचा देह ठेवला पण बाळाप्पा मात्र रोज स्वामींना अत्तर लावण्यास त्या गुंफेत उतरत असत. चार दिवसांनी स्वामींनीच डोळे उघडून त्यांना बस्स असं सांगितलं. त्या दिवसानंतर पुन्हा कोणीही त्या गुंफेत उतरलं नाही अन दरवाजा कायमचा बंद झाला.*
*देहत्यागापूर्वी अक्कलकोट जवळील नीलेगांवच्या भाऊसाहेब जहागिरदारांना श्री स्वामींनी "शनिवारी घरी येऊ" असे वचन दिले होते. त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी व एक अद्भुत लीला दाखवण्यासाठी देहत्यागानंतर पाच दिवसांनी श्री स्वामी समर्थ नीलेगांवाच्या वेशीबाहेर प्रकटले. या लीलेचे वैशिष्ट्य म्हणजे, स्वामी एकटे नाही तर संपूर्ण लवाजमा, सेवेकरी यांच्यासह तेथे प्रकटले होते. गावातील सर्व लोकांचे दर्शन झाल्यावर ते सगळ्यांसह अचानक कोठेतरी निघून गेले. लोकांनी खूप शोधले. शेवटी दुस-या दिवशी, रविवारी त्यांनी खुलाशासाठी अक्कलकोटात एक माणूस रवाना केला. तोवर दुपारी आणखी एक लीला घडली. स्वामी जहागिरदारांच्या वाड्यात एकटेच प्रकटले, पूजा स्वीकारली पण मौनच बाळगून होते. भाऊसाहेबांना दर्शन देऊन ते साक्षात् परब्रह्म तेथेच अदृश्य झाले. इकडे तो माणूस अक्कलकोटाहून स्वामींच्या मंगळवारी झालेल्या समाधीची वार्ता घेऊनच परतला. नीलेगांवच्या भक्तांना या अतर्क्य स्वामीलीलेचे आश्चर्य वाटून स्वामीप्रेमाने भरून आले. आजही श्री स्वामी समर्थ त्याच पावन देहाने प्रत्यक्ष कार्यरत आहेत, भक्तांचा सर्वतोपरी सांभाळ प्रेमाने करीत आहेत व पुढेही करतीलच !*
*🌸स्वामी होते, स्वामी आहेत अन स्वामी असणारच !!🌸*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
Hi! I am a robot. I just upvoted you! I found similar content that readers might be interested in:
http://www.xinjiejs.com/
Downvoting a post can decrease pending rewards and make it less visible. Common reasons:
Submit