कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वासमान्यांचा लोकल प्रवास बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळं प्रवासी, प्रवासी संघटना आणि अनेक स्थानिक नेते आंदोलन करत आहेत. अशातच, सर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू व्हावी या मागणीसाठी आता भाजपानं आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत शुक्रवारी भाजपा नेत्यांच्या नेतृत्वात यासाठी ठिकठिकाणी रेल्वे स्थानकांवर आंदोलनास सुरूवात झाली आहे. चर्चगेट स्टेशन बाहेर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात तर कांदिवलीमध्ये भाजपा आमदार अतुल भातखळकरांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू झालं आहे.
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांना प्रवास करण्याची मुभा मिळावी आणि लोकल प्रवासाला परवानगी न देण्याच्या विरोधात मुंबई भाजपाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. भाजपा नेते व कार्यकर्त्यांकडून महाविकासआघाडी सरकारविरोधात घोषबाजी करण्यात येत आहे. तर, या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी मोठ्याप्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचं दिसत आहे. शिवाय, भाजपाच्या काही कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलं गेलं आहे. चर्चगेट, दहिसर घाटकोपर या ठिकाणी आंदोलनास सुरूवात झाली आहे.
To read more, visit: www.mumbailive.com