अर्थ-

in marathi •  7 years ago 

*बाप करी जोडी, लेकराचे ओढी ।
*आपुली करवंडी वाळवूनी ।।
*एकाएकी केलों मिरसीचा धनी ।
*कडिये वागवूनी भार खांदी ।।

अर्थ-
"भविष्यात मुलाचं कल्याण व्हावं, या अपेक्षेपोटी वडील पैसा कमवत राहतात. यासाठी ते पोट पाठीला लागेपर्यंत कष्ट करतात. आयुष्यभर कमावलेलं सगळं ते मुलाला आयतं आणि एकदम देऊन टाकतात. मूल खूप लहान असताना त्याला कडेवर वागवतात, तर थोडं मोठं झाल्यावर त्याचं ओझं खांद्यावर वाहतात."

चिंतन-
वडील करीत असलेले काबाडकष्ट मुलाला सहज दिसणार नाहीत. या अभंगात तुकोबा नेमकं या विषयावर भर देतात. आपल्यासाठी वडील करीत असलेल्या कष्टाची जाणीव होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे.

'मी पाहिलेले दिवस माझ्या मुलाला पाहायला मिळू नये', 'मी भोगलेलं दुःख मुलांच्या वाट्याला येऊ नये', असंच प्रत्येक वडिलांना वाटतं. म्हणूनतर शाळेची फीस जास्त वाटत असली, तरी आपापल्या ऐपतीनुसार वडील मुलाला मोठ्या शाळेत टाकण्याचाच प्रयत्न करताना दिसतात.

'खूप कष्ट केले' म्हणत, 'आता स्वतःसाठी जगू' म्हणणाऱ्या वडिलांना मुलं मोठी झाली, की आधीचं घराचं कर्ज फिटत येत नाही तोपर्यंत, शिक्षणासाठी दुसरं कर्ज काढून उतरत्या वयात परत हप्ते फेडण्याची वेळ येते. हे मुलांना सहज दिसत नाही. 'आता स्वतःसाठी चार चाकी गाडी घेऊ' म्हणणाऱ्या वडिलांना कॉलेजला जाणाऱ्या मुलाला हप्त्यानं दोन चाकी गाडी घेऊन देण्याची वेळ आल्यावर, बापाचं स्वतःच्या गाडीचं स्वप्न भंगलेलं मुलाला सहज दिसत नाही.

तुकोबाराय मुलांना हेच सांगत आहेत, की 'तुम्ही लहान असताना त्यांनी तुम्हाला कडेवर घेतलं. अक्षरशः खांद्यावर घेऊन 'तुमचं ओझं वाहायलं.' याची तुम्ही मुलांनी जाणीव ठेवली पाहिजे. तुमच्यासाठी घर, गाडी, पैसा कामावताना उपासमार त्यांनी सहन केली. वेळेवर जेवणाचं भान नाही ठेवलं. कधी-कधी तर एवढे काबाडकष्ट केले, की त्यांचं पोट पाठीला टेकलं.'

मुलांसाठी जगणाऱ्या वडिलांना, ज्यावेळी मुलं मोठी होतात आणि वडिलांनाच उलटून बोलतात, 'आमच्यासाठी तुम्ही काही नाही केलं, आणि जे केलं ते तुमचं कर्तव्यच होतं' असं म्हणतात, त्यावेळी त्या वडिलांना किती पश्चात्ताप होत असेल? हे मुलांनी समजून घेतलं पाहिजे. ज्या घरात ते राहत आहेत, ते वडिलांनी तुमच्याच साठी कमावलेलं असत.

'मुलांनी मला मान दिला पाहिजे', असा हट्ट वडील कधीच करत नाहीत. पण 'निदान अपमान तरी करू नये', येवढी माफक अपेक्षा करण्याचा अधिकार तर त्यांना नक्कीच आहे. कर्तव्य म्हणून का होईना!
🙏

Authors get paid when people like you upvote their post.
If you enjoyed what you read here, create your account today and start earning FREE STEEM!