२.९ किमी लांबीचा घाटकोपर-मानखुर्द (Ghatkopar-Mankhurd ) उड्डाणपूल (flyover) रविवारपासून वाहतुकिसाठी खुला करण्यात आला आहे. जवळपास ३ वर्षांच्या विलंबानंतर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. उड्डाणपुलामुळे नवी मुंबई (Navi Mumbai) ते मुंबई (Mumbai) दरम्यान प्रवास करणाऱ्यांची घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे.
रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या उड्डाणपूलाचे उद्घाटन करण्यात आले. या उड्डाणपुलामुळे घाटकोपर ते मानखुर्द प्रवासाचा कालावधी २० ते २५ मिनिटांनी कमी होणार आहे. वाहनचालक-प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्यानं प्रवास सुखकर होऊ शकतो.
सायन-पनवेल मार्गाला आणि पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा घाटकोपर-मानखुर्द रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर कायम प्रचंड वाहतूक कोंडी असते. या रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्यानं वाहनचालक-प्रवासी हैराण होते. या पार्श्वभूमीवर पालिकेनं या रस्त्यावर २.९९१ किमी लांबीचा आणि २४.२ मीटररुंदीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला.
५८० कोटी रुपये खर्च करत सहा मार्गिकेच्या (उत्तर-दक्षिण) उड्डाणपुलाच्या कामाला २०१६ ला सुरुवात केली. हे काम २०१९ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांनी ते रखडले होते. पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंत्राटदारानं त्याचं बांधकाम पूर्ण करण्यास विलंब लावल्यानं ४० लाखांचा दंड आकारला आहे.
पालिकेनं ( BMC) देवनार डम्पिंग ग्राउंडला कनेक्टर जोडून फ्लायओव्हरच्या डिझाईनमध्ये बदल केले. त्यामुळे देखील फ्लायओव्हरची बांधकाम किंमत ७०० कोटींपेक्षा जास्त झाली. उड्डाणपुलामुळे घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरून नवी मुंबई त्यानंतर लोणावळा आणि पुढे पुण्याच्या दिशेनं जाता येईल.
To read more, visit: www.mumbailive.com